भूपाळी - प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
अल्बम : अण्णांची गाणी
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गायक : श्री चारुदत्त आफळे
ध्वनीमुद्रण : साउंड व्हिजन स्टुडीओ, पुणे
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहम् घोषचि घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.
माझे माझे लोप पावु दे तुझे तुझे उगवु दे
कोण असे मी? तो मी, तो मी सहजपणे कळु दे
प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।१
दृष्टि निवळु दे तिमिर जाऊ दे आशीर्वाद हवा
अभ्यासाचा या भजनाचा छंद जडु दे जिवा
सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।२
रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव
करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव
हरिमय होउन अम्हां जाणवो हरिमय नरनारी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।३
उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे व्हावे
सोऽहम् सोऽहम् म्हणता म्हणता ममत्व संपावे
सोऽहम् फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।४
जवळ घेउनी शिकवा गीता ओढ अशी लागली
घास सानुले करुनी भरवा आम्हा गुरुमाउली
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जपो सदा वैखरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।५
द्वंद्व न उरले दु:ख संपले अनुभव हा यावा
तिमिर मावळे गगन उजळले जाणवु दे गारवा
चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।६
स्वागत करतो सद्गुरुराया उमलो जीवनि उषा
कृपाप्रसादे स्वामी आपुल्या शमु दे सगळी तृषा
भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।७
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।
Ещё видео!