'अती तेथे माती' मराठी बोधकथा || 'Ati Tethe Mati' Marathi Moral Story
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचे एक गाव होते. गावातील सर्व लोक खूप सुखी होते. ते आपापल्या उद्योगांत मन लावून काम करायचे. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळायचे. आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव गाव होते ज्याने दुष्काळ कधी पाहिला नव्हता.
रामपूर मध्ये इतर सर्व शेतकरी आणि कामकाऱ्यांसोबतच एक भिकारी सुद्धा राहायचा. गावातील लोक इतके संपन्न आणि द्यावं होते की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यालासुद्धा कधीही उपाशी राहायची वेळ येत नव्हती.
हा भिकारी इतर कुठलेच काम करीत नसे. दिवसभर भिक्षा मागून आणणे आणि आराम करणे हेच त्याचे काम. एखाद्या दिवशी जर जास्त भिक्षा मिळाली तर हा दुसऱ्या दिवसाला परत भिक्षा मागायला फिरत नसे.
तसे या भिकाऱ्याचे दिवसही चांगलेच जात होते. गावातील लोक दयाळू असल्याने ते अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला येत होते. तरीसुद्धा हा भिकारी दररोज देवाकडे प्रार्थना करायचा. देवाला म्हणायचा ” देवा तू सगळ्यांना पाहिजे ते देतोस. मीच कोणती अशी चूक केली? तू मला धनधान्याने संपन्न का नाही बनवत? “
देवाकडे तक्रार करणे हा भिकाऱ्याचा नित्यनेमाचा कार्यक्रम होता. त्याच्या तक्रार करण्याला भिकार स्वतःची भक्ती म्हणायचा. त्याला वाटायचे कि आपण दररोज देवाची आठवण काढतो तरी देव आपल्याला काही देत नाही. आणि हे इतर लोक दिवसभरातून क्वचितच त्याचे करतात तरी यांना हि संपन्नता?
त्याच्या अश्या वागण्याचा आणि तक्रारींचा एक दिवस देवालाही राग आला. याला थोडी अक्कल आली पाहिजे म्हणून देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने धनधान्याची, संपन्नतेची देवता लक्षमी मातेला त्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले.
एक दिवस आपल्या नित्यनेमाप्रमाणे भिकारी भिक्षां मागून झाल्यानंतर दुपारच्यावेळेला एका झाडाखाली बसला होता. आणि सवयीप्रमाणे त्याने देवाकडे गाऱ्हाणे करणे सुरु केले. तेवढ्यात तेथे देवी लक्ष्मी प्रकटली. ती भिकाऱ्याला म्हणाली की ” मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे. म्हणून तुला मी हव्या तेवढ्या सोन्याच्या मोहरा देणार आहे.”
ते ऐकून भिकारी खूप आनंदित झाला. पुढे देवी म्हणाली की ” मात्र एक अट आहे. तू घरी पोहोचण्याआधी या मोहरांतील एकही मोहर जर जमिनीवर पडली तर त्यावेळी साऱ्याच मोहोरांचे मातीत रूपांतर होईल.”
मोहरांबद्दल ऐकून भिकारी त्या मोहरा मिळाळ्यानंतर आपले जगणे कसे बदलून जाईल याचाच विचार करीत बसला. तो त्याच्या स्वप्नात इतका रंगून गेला कि त्याचे त्या अटींकडे तेवढे लक्षच राहिले नाही. त्याने लगेच मोहरा जमा करण्यासाठी आपली झोळी समोर केली.
लक्ष्मी मातेने त्याच्या झोळीत सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली. झोळीत मोहोर पडत होती. भिकाऱ्याचा आनंद वाढत होता. थोड्या मोहरा टाकून झाल्या कि देवी त्याला विचारायची “एवढ्या मोहरांनी तू समाधानी आहेस का?’ त्यावर तो ” मला आणखी मोहरा हव्यात .” असे म्हणून आणखी मागायचा.
हा क्रम असाच सुरु राहिला. एक वेळ अशी आली की आता मोहोरांचा भार त्याला पेलवत नव्हता. तरी तो संतुष्ट नव्हता. त्याचा लोभ उच्चकोटीला पोहचला होता. आणि त्या लोभाच्या भरात तो देवीने सांगितलेली अट तर विसरालाच पण सोबत हेही विसरला कि त्याची झोळी पार जुनी झाली आहे. जी केव्हाही फाटू शकते.
थोड्या वेळाने झालेही तेच. भिकाऱ्याची जीर्ण झालेली झोळी एके ठिकाणी फाटली. काही मोहरा जमिनीवर पडल्या. देवीच्या अटीप्रमाणे त्यांची माती झाली. सोबतच झोळीतील साऱ्याच मोहरांची माती झाली. आणि भिकारी त्यावर काही बोलेल तोच देवीने त्याला “तथास्तु” म्हणून आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाली.
आता भिकाऱ्याजवळ फाटलेली झोळी आणि त्या मोहरांची माती याशिवाय काहीच नव्हते. आपल्या लोभी वृत्तीला नावबोटे ठेवत मोठ्या जड अंतःकरणाने तो घरी परतला. मात्र त्याला एक नवा साक्षात्कार झाला. त्याला त्याचा चुकीचा दृष्टिकोन लक्षात आला. आता तो लोकांच्या फक्त संपन्नतेकडे न बघता त्यांची मेहनत सुद्धा पाहू लागला.
त्यातच त्याला कळले कि सुखी होण्यासाठी मेहनत आणि समाधानाला पर्याय नाही. कमी मेहनतीत मिळालेलं धन फक्त लोभ वाढवत. म्हणून मग त्याने लोकांची छोटी मोठी कामे करणे सुरु केले. आणि भिक्षा मागून जगणे बंद केले. त्याच्यातील परिवर्तन पाहून गावातील लोकही आनंदी होते.
तात्पर्य – मंडळी यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाहीच. देवही त्याच्याच मदतीला येतो जो स्वतःची मदत करतो. आणि कुठल्याही गोष्टीत अतिरेक हा विनाशाचे कारण बनतो. गोष्ट चांगली का असेना मात्र अति झाली की ती मानवासाठी विषासमानच असते.
अशाच नवनवीन गोष्टीसाठी चॅनलला लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करा.
#marathistory
#marathistorytelling
#marathistoryforkids
#marathistorywithmoral
#marathistorieswithmoral
#मराठीबोधकथा
#माराठीकहानी
#मराठीगोष्टी
प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.
Ещё видео!